वीज पडून मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्या! आमदार संजय देरकर
वणी :- विधानसभा क्षेत्रातील मारेगाव तालुक्यातील मौजा केगावं येथे २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वीज पडून मृत पावलेल्या श्रीमती मेघा गणपत पानघाटे वय ५५ या महीलेच्या कुटुंबाची वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट घेतली असता या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीडित कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत प्रदान करण्याच्या सूचना आमदार संजय देरकर यांनी तहसील प्रशासनाला दिल्या आहे.Provide-immediate-assistance-to-the-family-of-the-woman-who-died-due-to-lightning!-MLA-Sanjay-Dekar
२७ डिसेंबर ला अचानक निसर्गात बदल होत ढगाळी वातावरण तयार झाले होते,आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला होता. अशातच शेतकरी महिला शिवारातून घरी परत येत असतांना विजेचे तांडव सुरू झाले होते. यातच वीज पडली व नैसर्गिक अपघातात मेघा पानघाटे या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील मृतक महिलेचे शव मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आल्याची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच, त्यांनी थेट मारेगाव गाठले व रुग्णालयात जावून आपत्ती पीडित कुटुंबाची सात्वनपर भेट घेतली व त्यांना धीर दिला.
प्रसंगी उपस्थित मारेगावचे तहसीलदार निलावार यांना पीडित कुटुंबाला तात्काळ शासकीय निधीची मदत देण्याच्या सूचना आमदार संजय देरकर यांनी दिल्या आहेत.
मृत मेघा पानघाटे हिच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी आहे असा आप्त परिवार असून या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.