पुलाजवळील तो अपघात की हाणामारी
वणी:- मुकुटंबन मार्गावरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ अपघात झाला असल्याची घटना ४ ऑगस्ट ला रात्री साडेअकरा वाजताचे सुमारास घडल्याचे वृत्त समाज माध्यमातून प्रकाशित झाले होते. मात्र सदर अपघात नसून तुंबळ हाणामारी झाल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगतांना दिसते आहे. आता सदर घटना अपघाताची की, हाणामारी ची यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Was-"that"-accident-near-the-bridge -a-fight?
शहरालगत असलेल्या गणेशपूर परिसरात एका राजकिय पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसंगी वणी मारेगाव तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ,सोबतच जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी सुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रम बहारदार करण्यासाठी गाण्याची मैफिल रंगली होती. यात पक्षाचे पदाधिकारी कसे मागे राहणार. अनेकांनी गाणी सुद्धा गायली. कार्यक्रमात महिला सुध्दा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम चांगलाच रंगात आला होता. बेभान होऊन कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत असतानाच एका जबाबदार पदाधिकाऱ्याने उपस्थित महिलेवर अभद्र टिप्पणी केली अन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली. वादाचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. सदर पदाधिकाऱ्याला काही उपस्थितांनी चांगलेच बदडले यात तो गंभीर जखमी झाला असल्याचे चर्चेतून पुढे आले. सदर कार्यक्रम राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा असल्याने सदर घटना दडपली असल्याची कुजबुज ऐकायला मिळाली. तुंबळ हाणामारी अन त्याला अपघाताची किनार? जर अपघात असेल तर पोलिसांत तक्रार दाखल का करण्यात आली नाही. या घटनेची नोंद पोलिसांच्या डायरीत का नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहे. राजकीय वरदहस्त वापरून सदर प्रकरण दडपले तर नसेल ना? एकूणच अपघाताची नोंद नाही. हाणामारी ची नोंद नाही. मात्र यात सदर जखमी झालेल्या व्यक्तीला कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आणि उपचार करणाऱ्या डॉक्टर चे निदान काय आहे? असे अनेक प्रश्न परिसरात रंगत असलेल्या चर्चेतून उपस्थित होतांना दिसत आहे. आता "तो" अपघात की, हाणामारी हे एक कोडेच आहे. यात पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे. हे कोडे त्यांना सुटेल का? ही येणारी वेळच ठरविणार आहे. खरंच जखमीने महिलावर अभद्र टिप्पणी केल्यामुळेच हा प्रकार घडला का? मग टिप्पणी करणारा कोणत्या सुसंस्कृत तालमीत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहे.
पक्षाचे पदाधिकारी फक्त मंचावर
वणी परिसरातील बहुतांश पक्षाचे पदाधिकारी केवळ मंचावर, नेते उपस्थित असते त्यावेळी बघायला मिळते. जनतेच्या समस्या घेऊन त्याला न्याय देण्याची भूमिका सध्यातरी मनसे, काँग्रेस प्रदेश चे पदाधिकारी घेताना दिसते आहे. मात्र इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपल्यातच खुश असतांना दिसत आहे. नेते आले की, हे कार्यकर्त्यांना सोडून थेट मंचावर उडी घेण्यात पटाईत आहे. पदे घेऊन तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविणे यांना जमणार का? हाच खरा प्रश्न आहे. पदे मिळवून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना वणी परिसरातील मुख्य पक्षाचे पदाधिकारी दिसत आहे. निवडणुका आल्या की,हे सक्रिय होणार. इतर वेळी जनतेला गाजर दाखविणारे पदाधिकारी सध्यातरी वणीच्या राजकीय वर्तुळात बघायला मिळते आहे.

