महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
गुरूनगर येथील घटना.
वणी:- मारेगाव येथील महाविद्यालयात बीएससी च्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय युवकाने किरायाचे घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १६ फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
वणी तालुक्यातील मेंढोली येथील विवेक उमेश बोंडे हा युवक बहिणीसह गुरूनगर येथील खंदारे यांचे घरी किरायाने राहत होता. तो मारेगाव येथील महाविद्यालयात बीएससी च्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. दोघे बहीण भाऊ शिक्षणासाठी शहरात आले होते. दरम्यान बहीण ही गावाला गेली होती. विवेक घरी एकटाच होता. हीच संधी साधून त्याने किरायाने राहत असलेल्या घरात गळफास घेतला. ही बाब शुक्रवारी सकाळी उजेडात आली. त्याने रात्रीच गळफास घेतला असल्याचा कयास वर्तविण्यात येत होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व विवेकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
सध्याच्या काळात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विवेकने आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होते आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असले तरी पोलीस तपासात उघड होण्याची शक्यता आहे. तूर्तास या घटनेचा वणी पोलीस तपास करीत आहेत. विवेकच्या या टोकाच्या निर्णयाने कुटुंब मात्र पूर्णतः हादरले आहे.

