झरी तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रशिक्षण..?
आरोग्य विभाग चिरीमिरीत दंग.
वणी:- झरी-जामनी या आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यात बोगस डॉक्टर तयार होत आहे. आजूबाजूचे पोड, तांडा वस्त्यात त्यांचे बस्तान आहेत. यातच त्यांना प्रशिक्षण देणारा डॉक्टर सध्यातरी शिबला चौफुलीवर तैनात आहे. Training-of-bogus-doctors-in-Jhari-taluka..?
अतिदुर्गम, दुर्लक्षित तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी तालुक्यातील बहुतांश गावात बोगस डॉक्टरांचे जणू पेवच फुटले आहे. याचे कारणही तसेच आहे. मागील काळात जीवघेण्या आजारावर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सोबतच आरोग्य विभागाने छापा टाकला असता शिबला येथील बोगस डॉक्टर कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. सदर बोगस डॉक्टर इथेच थांबला नाही तर, त्याने शिबला येथे जणू बोगस डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा वर्गच भरविला असल्याचे लोकांत कुजबुज आहे. सदर बोगस डॉक्टर जणू सिकंदर असल्याचा भास निर्माण करीत गरीब अज्ञानी जनतेच्या भावनांशी खेळ करून त्यांच्या आरोग्याशी खेळतांना दिसतो आहे. झरी जामनी तालुक्यात बहुतांश गावात बंगाल येथून आणलेल्या पोरांना प्रशिक्षित करून गावागावात त्यांचे बस्तान बसविले असल्याचे दिसते आहे. सदर प्रशिक्षण केंद्र शिबला चौफुलीवर असल्याचे बोलले जात आहे. सदर बोगस डॉक्टरांचे प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना कोणाचे अभय आहे. आणि विद्यमान सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असताना येथील आरोग्य प्रशासन मात्र मूग गिळून जणू गप्पच आहे.
तालुका वैद्यकीय विभागाचा कारभार चव्हाट्यावर?
झरी तालुक्यातील बहुतांश गावात बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना ज्ञात आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे.
पोलीस विभागाने कारवाई करण्याची गरज.
मागील काळात उपविभागीय अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वणी उपविभागातील बोगस डॉक्टर विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. यात अनेक बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.हे विशेष. परिणामी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी गांभीर्य लक्षात घेत पुनःश्च कारवाईचा बडगा उगारून अतिदुर्गम भागातील जनतेला न्याय देण्याची मागणी सामान्य जनतेतून होते आहे.
शिबला येथील बोगस डॉक्टर प्रशिक्षण केंद्राला अभय कोणाचे?
गेल्या २० वर्षांपासून शिबला येथे बोगस डॉक्टर तैनात आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र असतांना देखील येथील वैद्यकीय अधिकारी तक्रार करण्यास धजावत नाही. परिणामी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना येथील राजकीय पुढारी जणू गप्पच आहेत. सोबतच शासनाचे आरोग्य केंद्रे ओस पडतांना दिसते आहे. आता नवनिर्वाचित आमदार या गंभीर प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन उठाव करणार का? हाच खरा प्रश्न आहे. या जाळ्यात तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र यांचाही समावेश असल्याची कुजबुज आहे.