वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सव्वा कोटीचा अपहार
अध्यक्षांसह चार जणांवर गुन्हा दाखल
वणी:- वणी पोलिसांनी वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. राजूर कॉलरी येथे १ कोटी २७ लाख ९ हजार ८०१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तालुका लेखा परीक्षक अभय वसंतराव निकोडे (वय ४३) यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. Western-Coalfield-Employees-Cooperative-Credit-Society-embezzled-Rs.-1.25-crore
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप जानबा टेंबूर्डे (अध्यक्ष), रमेश मोलीराम कनोजीया (सचिव), संजय अर्जुन शेटीया (लिपीक) आणि मदन कृष्णाजी अंडूस्कर (तत्कालीन लिपीक) यांनी संगनमत करून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत हा अपहार केला.
आरोपींनी संस्थेच्या सीसी कर्ज खात्यातील रक्कमा परस्पर विड्रॉल केल्या. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार होते. त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून बनावट चेकच्या साहाय्याने वेळोवेळी रकमा काढल्या आणि त्या रकमा कॅशबुकला जमा न करता अपहार केला. या अपहारातून संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आरोपींनी स्वतःला आर्थिक लाभ करून घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 34, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक वणी गोपाल उंबरकर करीत आहेत.

