पती-पत्नी एकत्रीकरण बदलीत शिक्षिकेचा असा ही डाव
वणी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून होत आहे. या प्रक्रियेतील एका शिक्षिकेने संबंधित विभागाच्या अभियंत्याला हाताशी धरून अवघ्या वीस किलोमीटर गावाला चक्क ३१ किलोमीटर अंतर दाखवीत बदलीसाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा शिक्षकात जोरदार सुरू आहे.This-is-the-trick-of-the-teacher-in-transferring-husband-and-wife-to-unite
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेने पती-पत्नी एकत्रीकरण या प्रवर्गातून बदलीसाठी अर्ज दाखल केला आहे. पती वणी पंचायत समितीच्या एका विभागात कार्यरत आहे. शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर पतीची नियुक्ती आहे. तर त्या गावापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत पत्नी आहे. साधारणतः वणी पासून ही शाळा आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच बदली पात्रतेसाठी ३० किलोमीटर अंतराचे निकष असतांना संबंधित अभियंत्याचे प्रमाणपत्र जोडून शासनाची व प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात घडला असल्याची खमंग चर्चा शिक्षकात जोरात सुरू आहे. शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतर असलेल्या गावाचे अंतर ३० किलोमीटर दाखविण्यासाठी बांधकाम विभागातील अभियंत्याचे कोणत्या पद्धतीने मोजमाप करून अंतर वाढवून दाखविले हे एक कोडेच आहे. कोणत्याही प्रकारे मोजमाप केले तरी संबंधित शाळा व पतीचे मुख्यालय यातील अंतर २० किमी पेक्षा जास्त नसून हा केवळ बदलीसाठी प्रशासनाची दिशाभूल करून एक डाव खेळल्याच्या प्रकाराची चर्चा सध्या जोरात आहे.