मनसे कार्यकर्त्यावर आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
Wani-Yavatmal
Sangini News
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता लागू झाली आहे. यातच शुक्रवारी शिव जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात शासनाने नेमून दिलेल्या व्हिडीओ सर्वेक्षण पथकाने सदर कार्यक्रमाचे चित्रीकरण केले होते. या चित्रफितीत मनसेचा चिन्ह, नाव असलेला झेंडा आढळून आल्याने आयोजक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यावर आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने भरारी पथक सुद्धा नेमले आहे. सदर पथके परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. २८ मार्च शुक्रवारी तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वणी शहरातील शिवतीर्थावर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात भव्य किल्याचा देखावा सुद्धा साकारला होता. या देखाव्याचे चित्रीकरण आचार संहिता भरारी पथकाच्या व्हिडीओ सर्वेक्षण पथकाने केले होते. सदर चित्रीकरणातील व्हिडीओ फीत मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकिय पक्षाचा झेंडा , पक्षाचे नाव , चिन्ह असलेले झेंडे आढळून आले होते. परिणामी हा सगळा प्रकार आचारसंहिता भंग करणारा असल्याने व्हिडीओ सर्वेक्षण भरारी पथक प्रमुख जी एन देठे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवजयंती उत्सवाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता वैभव सुनील पुराणकर विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
