शिकवणीला गेलेला अनिरुद्ध बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार
वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर ईजारा येथील आटो चालविणाऱ्याचा १७ वर्ष आठ महिने वय असलेला अनिरुद्ध शिकवणीला वणी शहरात गेला व तो घरी परत आलाच नसल्याने वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. Anirudh, who had gone to study, was reported missing in the police
तालुक्यातील राजूर ईजारा येथील अमोल रवींद्र गवळी या आटो चालकाचा मुलगा वणीतील महाविद्यालयात १२ वी चे शिक्षण घेत होता. त्यातच तो विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या खाजगी शिकवणीला सुद्धा जात होता. नेहमीप्रमाणे १६ सप्टेंबर ला अनिरुद्ध शिकवणीला निघाला होता. मात्र तो नेहमीच्या वेळेत घरी न आल्याने पालकांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क करून बघितला.पण त्यांचा संपर्क झालाच नाही. पालकांना त्याची काळजी वाटायला लागली. त्यांनी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांशी संपर्क साधला असता अनिरुद्ध शिकवणीमध्ये आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली. मात्र अनिरुद्ध चा थांगपत्ता कुठेही लागला नाही.
अखेर अनिरुद्ध चे वडील अमोल रवींद्र गवळी यांनी पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार वणी पोलिसांनी बिएनएस च्या कलम १३७ नुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करीत शोध मोहीम सुरू केली आहे.
अनिरुद्ध चे अपहरण केल्याचा वडिलांना संशय?
वणी येथील महाविद्यालयात १२वीचे शिक्षण घेणारा अल्पवयीन अनिरुद्ध शिकवणी वरून घरी परतला नसल्याने वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र यात त्याचे अपहरण केल्याची शंका सुद्धा उपस्थित केली आहे. जर अपहरण झाले तर कशासाठी? हा सुद्धा एक प्रश्नच आहे. तूर्तास वणी पोलीस अनिरुद्ध चा शोध घेत आहे.

