बाबापूर येथील नवसाच्या गणपतीला भक्तांची मांदियाळी
वणी(यवतमाळ):- रवी ढुमणे
वणी तालुक्यातील बाबापूर या गावात सन १९२० चे सुमारास प्लेग ची साथ सुरू झाली होती. दरम्यान ग्रामस्थांनी प्लेग ची साथ हद्दपार होण्यासाठी गावात गणपतीची स्थापना केली. व प्लेग ची साथ नाहीशी झाली. म्हणून बाबापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख निर्माण झाली अन या गावात संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांची जणू रिघच लागली. दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
वणी तालुक्यातील कायर गावाच्या अगदी जवळ असलेले बाबापूर हे गाव. या गावात बहुतांश ग्रामस्थ शेती व्यवसाय करतात. याच बाबापूर गावात गेल्या सव्वाशे वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात केली. यामागचे कारणही तसेच होते. त्याकाळी सर्वत्र प्लेग या जीवघेण्या आजाराची गावागावात साथ पसरली होती. परिणामी ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात होते.काही प्रमाणात या गावात सुद्धा प्लेगची साथ सुरू झाली होती. जर गावात प्लेगची साथ आली नाही तर, गावात गणपतीची स्थापना करणार असा सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता. त्यानंतर गावात प्लेग ची साथ आलीच नाही. परिणामी ग्रामस्थांनी आपण स्थापन केलेल्या गणपती मुळे गावात साथ आली नाही. असा समज झाल्याने नवसाला पावणारा बाबापूर चा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाला. हळूहळू अनेक भागातील लोक दर्शनासाठी यायला लागले. आणि नवस बोलत होते. भक्तांची मनोकामना पूर्ण होत गेली. आणि आणखीच या नवसाच्या गणपती ला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. असे ग्रामस्थ सांगतात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांनी घेतले सहकुटुंब दर्शन
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी सहकुटुंब बाबापूर येथील नवसाला पावणाऱ्या गणपतीचे दर्शन घेतले. आणि मंडळाच्या सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
संपूर्ण महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यातील भाविकांची मांदियाळी
बाबापूर येथील नवसाला पावणाऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात व काही नवस फेडतात तर काही नवस बोलून रांगेत उभे राहून महाप्रसाद घेतात. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात. आणि सर्व ग्रामस्थ येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतात. गावातील प्रत्येक घरी पाहुण्यांची जणू वर्दळ असते. आलेल्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. भाविकांची वाहने रांगेत लावण्यासाठी गावातील स्वयंसेवक आपले काम चोख बजावतात.
संपूर्ण गणपती उत्सवात भाविकांना महाप्रसाद
राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामस्थांनी दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात दररोज सकाळपासून भोजनाची व्यवस्था महाप्रसाद म्हणून मंडळ करते. दर्शनासाठी येणारे हजारो भाविक रांगेत उभे राहून महाप्रसाद घेतात. यासाठी सभा मंडपात पंगती बसविल्या जातात. तर मुख्य द्वारावर येणाऱ्या प्रत्येक भक्तांना एक ग्लास ताक सुद्धा प्यायला देतात. परिणामी भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी बाबापूर ग्रामस्थ आवर्जून घेतात.
विसर्जनासाठी होतेय अलोट गर्दी
दहा दिवसांच्या या गणपती उत्सवात बाबापूर येथे भाविकांची अलोट गर्दी असते. या गावात दहा दिवस जणू यात्रेचे स्वरूप असते. यात भजने,कीर्तन नित्यनेमाने सुरू असते. झरी जामनी तालुक्यातील मार्की येथील बंडू पारखी भाविकांच्या सेवेसाठी उत्सवातील दहा दिवस बाबापूर येथे मुक्कामी असतात. विसर्जन मिरवणुकीत ५० हुन अधिक दिंड्या,परिसरातील भजनी मंडळ या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात असे मंडळाचे अध्यक्ष संजय भोयर यांनी सांगितले आहे.
शासन,प्रशासनाचे दुर्लक्ष!
गेल्या सव्वाशे वर्षांपासून चालत आलेल्या बाबापूर येथील नवसाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अफाट गर्दी होते. या उत्सवाचे नियोजन ग्रामस्थ करतात. दर्शनाला लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे राजकीय नेते तसेच अधिकारी येतात खरे. परंतु आजतागायत कोणत्याही पुढारी,लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी शासनस्तरावर कोणताही पाठपुरावा केला नसल्याने बाबापूर येथील मंदिर दुर्लक्षित असल्याचे ग्रामस्थ सांगताहेत.
उत्सवात शिरपूर पोलिसांचे मदत केंद्र
दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात भाविकांच्या मदतीसाठी शिरपूर पोलिसांचे येथे मदत केंद्र आहे. यात पोलीस, वाहतूक पोलीस होमगार्ड व अधिकारी भक्तांच्या सेवेसाठी तत्पर असतात. आजूबाजूला विविध प्रकारच्या साहित्याचे दुकाने सुद्धा असतात. एकूणच बाबापूर येथील गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. सोबतच मंडळ भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेते. त्यामुळे दिवसेंदिवस या उत्सवाला चांगलीच प्रसिद्धी मिळते आहे.

%20(1)-min.jpg)