१६ शेतकऱ्यांचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुटले.
संगिनी न्यूज नेटवर्क झरी जामणी : आरसीसीपीएल आणि एम पी बिर्ला सिमेंट कंपनीच्या विरोधात मुकूटबन येथील १६ शेतकऱ्यांनी दि. ५ फेब्रुवारी सकाळी ११:०० वाजता पासून कंपनीचे सुरक्षा भिंती लगत असलेले गेट नं. ४ जवळ सुभाष सोमन्ना तिपर्तीवार यांचे शेतात (येडशी रोड मुकूटबन) आमरण उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाची सांगता तिसऱ्या दिवशी महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले. The-hunger-strike-of-16-farmers-ended-on-the-third-day.
सिमेंट कंपनीचे केमिकल युक्त धुळ व प्रदुषणामुळे शेतमालाची प्रति एकर एक लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू होते. अखेर तिसऱ्या दिवशी महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार राजेंद्र मसराम, मंडळ अधिकारी सुभाष खैरे, पोलीस प्रशासनाचे प्रभारी ठाणेदार स्वप्निल ठाकरे, हवालदार दिलीप जाधव, संदीप बोरकर, संदीप तिजारे आणि RCCPL & MP बिर्ला सिमेंट कंपनीचे अधिकारी कंपनीचे अधिकारी सचिन सखुजा, बृजमोहन वर्मा, सुदीप व्दीवेदी, विजय कांबळे, रवींद्र पाटील व १६ शेतकऱ्यांत चर्चा झाली. या चर्चेत समन्वय घडून आल्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
कंपनीकडून या मागण्या पूर्ण करण्यात आल्या.
१६ शेतकऱ्यांपैकी ६ शेतकऱ्यांना शासन निर्णय प्रती हेक्टरी १३ हजार ६०० रुपयाचे चार पट करून ५४ हजार ४०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. उर्वरित १० शेतकऱ्यांना दोन पट करून प्रती हेक्टरी २७ हजार २०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच सीएसआर फंडातून प्रती एकर १० हजार रुपयाची शेती सामग्री देण्यात येईल. यापुढे कंपनीच्या धुळीमुळे नुकसान झाल्यास उपोषण न करता उचीत क्षतीपुर्ती कंपनीकडून करून देण्यात येईल. या मागण्या शेतकऱ्यांनी मंजूर केल्यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली