वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी
अतीवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन
"अन्यथा शेतक-यांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल – संजय खाडे यांचा इशारा."
"वर्धा व पैनगंगेला आलेल्या पुरामुळे व अतीवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली."
वणी – अतीवृष्टीमुळे वणी उपविभागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात झरी व वणी तालुक्यात तर या महिन्यात वणी व मारेगाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परिणामी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी तहसिल कार्यालयात धडक देत काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. Congress demands to declare wet drought in Wani subdivision
या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतक-यांना एकरी 50 हजारांचे अनुदान द्यावे, यासह सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा. सीसीआय कापूस नोंदणीची मुदत वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर ओला दुष्काळ जाहीर न केल्यास काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सततच्या अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे कठिण झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला असताना शासन अजूनही मौन बाळगून बसले आहे. त्यामुळे वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन छेडू.
— संजय रामचंद्र खाडे, प्रदेश सचिव, काँग्रेस
निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, तेजराज बोढे, डॉ. शंकर व-हाटे, उत्तम गेडाम, विकेश पानघटे, प्रमोद लोणारे, देवराव देऊळकर, दिनेश पाहूनकर, उषा नरेंद्र काटोके, विनित तोडकर, पुंडलीक गुंजेकर, संदीप कांबळे, प्रफुल्ल वाळके, नरेंद्र चिकटे, महादेव तुराणकर, सुधीर खंडारकर, संजय शेंडे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

.jpg)