शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे खासदारांचे निर्देश
वणी:- अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी संबंधित विभागाने शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सालेभट्टी येथील शेतात पाहणी करीत असताना दिले आहे. MPs direct immediate Panchnama of crops in the fields
यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना महापूर आले आहे. शेतीही खरडून गेली आहे. काढणीला आलेले सोयाबीन जागीच सडून गेले आहे. कापसाचे बोंड फुटायला लागले आहेत. ते सुद्धा जागीच उगवताना दिसते आहे. घरातील सर्व पैसा खर्च करून शेतकऱ्यांनी शेतात घातला पण ऐन काढणीच्या वेळेला अस्मानी संकटाने शेतातील शेतमाल भुईसपाट केला आहे. परिणामी शेतकऱ्यावर एकीकडे अस्मानी व दुसरीकडे सुल्तानी संकट ओढवले आहे. निसर्गाने तोंडचा घास पळवला आहे. परिणामी शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अद्यापही शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
झरी तालुक्यातील पूरपरिस्थिती व शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सालेभट्टी येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. प्रसंगी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, तालुका काँग्रेस पार्टी झरीचे अध्यक्ष संदीप बुर्रेवार, प्रकाश कासावार, भगवान चुक्कलवार ,भूमारेड्डी बजनलावार, हरिदास गुर्जलवार, व कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

