घोषणाबाजी सरकारच्या काळात युवा शेतकऱ्याचा बळी
कर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
अतिवृष्टी, कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय!
वणी/ Sangini News :- मुकूटबन पोलीस हद्दीत येणाऱ्या तेजापूर येथील ३० वर्षीय युवा शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर गुरुवारला सायंकाळी उघडकीस आली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित असतांना शासनाने केवळ घोषणाबाजी करून ऐन दिवाळीत कोणतीही मदत न दिल्याने युवा शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलले असल्याची ग्रामस्थांकडून चर्चा ऐकायला मिळाली. A young farmer was killed during the slogan-mongering government.
वणी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या तेजापूर येथील मंगेश संजय पिंपळकर हा पत्नी आईवडील व लहान मुलीसह राहून स्वतःच्या मालकीची चार एकर शेतजमीन कसून उदरनिर्वाह करीत होता. यावर्षी सततचा पाऊस,अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पूर्णतः गेले. यातच शेती करण्यासाठी उचलले कर्ज तर दुसरीकडे शेतातील हातून गेलेले पीक याच विवंचनेत तो होता.
अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि शासनाच्या मदतीचा लाभ न मिळाल्याने त्याने टोकाचा निर्णय घेत गुरुवारी सायंकाळी राहते घरी विषारी द्रव्य प्राशन केले. उपचारासाठी त्याला कायर येथील रुग्णालयात दाखल केले. मंगेश ची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घोषणाबाजी सरकारचा युवा शेतकरी ठरला बळी!
शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे जाहीर केले होते. मात्र केवळ शब्दाचा खेळ करीत ऐन दिवाळीत शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिली नाही. केवळ निकष, नियम,अटी यातच शेतकऱ्यांनाची संपूर्ण दिवाळी अंधारात गेली. परंतु शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत पोहचली नाही. परिणामी घोषणाबाजी सरकारने शेतकऱ्याचा बळी घेतला असल्याचा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शासनाने पीडित कुटुंबाला तात्काळ मदत करण्याची मागणी
मंगेश च्या पश्चात पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने मंगेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेजापूर गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत व शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

