स्वप्नील च्या खुनातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
वणी /:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडगांव मार्गावरील गजानन नगरीत शुक्रवारी स्वप्नील राऊत या तरुणाची हत्या करून आरोपी पसार झाले होते. फॉरेन्सिक चमुच्या मदतीने पोलिसांनी दोन आरोपीना अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत. Police arrest accused in Swapnil's murder।
शहरातील रंगनाथ नगर भागातील स्वप्नील किशोर राऊत २६, या विवाहित तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून तपासाला सुरुवात केली होती. यात फॉरेन्सिक चमुच्या मदतीने तपासाची चक्रे फिरली अवघ्या २४ तासात सुमेश रमेश टेकाम २४ रा. वडजापूर , सौरभ मारोती आत्राम वडजापूर या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
स्वप्नीलच्या खुनाचा घटनाक्रम!
गुरुवार २३/१०/२०२५ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मृतक स्वप्नील किशोर राऊत याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सायंकाळी ६:०० वाजता पत्नीने फोन केला असता, तो लवकरच घरी येतो असे त्याने सांगितले. मात्र, रात्री आठ वाजता परत फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. तेव्हापासून तो घरी परतला नाही. शुक्रवार २४/१०/२०२५ रोजी सकाळी ६:०० वाजता कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन नगरी, वडगाव टीप रोड, वणी येथे एका मृतदेहाचा फोटो पाहिला असता तो स्वप्नीलचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाचा मोठा भाऊ चेतन यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, स्वप्नीलचा मृतदेह गळा व डोक्याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून स्वप्नीलची हत्या केल्याची फिर्याद चेतन राऊत यांनी २५/१०/२०२५ रोजी रात्री साडेबारा वाजता वणी पोलीस ठाण्यात दिली.
अनैतिक संबंध ठरला अडसर
स्वप्नीलच्या पत्नीचे सुमेश टेकाम सोबत अनैतिक संबंध होते. परिणामी सुमेश ला स्वप्नील अडसर ठरत होता. शुक्रवारी सुमेश ने फोन करून स्वप्नील ला बोलावून घेतले. आणि लाल रंगाच्या दुचाकीवरून ब्राम्ही फाटा, टोल नाका व थेट गजानन नगरी असा प्रवास करून गजानन नगरीत दारू प्यायला बसले. दोघांनी स्वप्नील ला जास्तच दारू पाजली. त्याला दारू चढताच स्वप्नीलच्या डोक्यात दगड टाकला. स्वप्नील जमिनीवर धारातीर्थी पडताच जवळ असलेली काचेची बॉटल फोडून त्याचा गळा चिरला व तेथून पळ काढला.
पोलिसांची कारवाई व तपास:
स्वप्नीलचा भाऊ चेतन याने दिलेल्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, पोलीस स्टेशन वणी यांच्या आदेशाने, पोउपनि सुदाम आसोरे, पोलीस अंमलदार श्याम नंदकुमार मानेश्वर, गजानन, गणेश तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मृतकाच्या शेवटच्या हालचालींचा मागोवा घेतला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे, सर्व बाबी तपासून त्या दिशेने तपास करून आरोपीना जेरबंद केले.
आरोपींच्या चौकशीत ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे. वणी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करून या गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे.
पुढील तपास पो उपनि सुदाम आसोरे करीत आहेत.

